Bird Flu : महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात 2000 हून अधिक पक्ष्यांना मारण्याचे आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बर्ड फ्लू (Bird Flu) ने दरवाजा ठोठावल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. सर्वात मोठा धोका महाराष्ट्राला आहे. मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांतील परभणी आणि बीडच्या दोन गावांतील मृत कोंबड्यांच्या नमुन्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. यानंतर प्रशासनाने 2 हजाराहून अधिक पक्ष्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील कुपटा या गावात आणि बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथून मृत कोंबड्यांचे नमुने घेण्यात आले होते. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या नमुन्यांचे अहवाल आले, ज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली.

या भागात कोंबड्यांना आणण्यास परवानगी नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या भागांना निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. येथे पक्ष्यांना मारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कुपटामध्ये सुमारे 468 पक्षी मारले जातील, असे जिल्हाधिकारी दीपक मुहाळीकर यांनी सांगितले. लोखंडी सावरगावमध्ये सुमारे 1600 पक्षी मारण्याची तयारी सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. रवी सुरेवाड यांनी सांगितले. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर येथे आतापर्यंत 3 हजार 949 पक्षी मारले गेले आहेत.

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये बर्ड फ्लूचा धोका
केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्येही बर्ड फ्लूचा धोका आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणाले की येथून मृत कावळ्यांपासून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. यासंदर्भात एक अहवाल प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. आयव्हीआरआय लॅबचे प्रभारी व्हीके गुप्ता म्हणाले की पूरनपूर आणि पीलीभीत येथून घेतल्या गेलेल्या कोंबड्यांच्या नमुन्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. यामुळे सर्व कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचा व पीपीई किट परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बर्ड फ्लूची लक्षणे
बर्ड फ्लूची लक्षणे सामान्य फ्लूच्या लक्षणांप्रमाणेच असतात. H5N1 इन्फेक्शनच्या सानिध्यात आल्यावर आपल्याला खोकला, डायरिया, श्वसन समस्या, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अस्वस्थता, नाक वाहने किंवा घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवू शकतात.