अंबानी प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांचे मोठं विधान, म्हणाले – ‘ती इनोव्हा गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला वेगळ वळण लागले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यानंतर आता फडणवीस यांनी आणखी एक मोठ विधान केले आहे. अंबांनींच्या घराबाहेर स्कॉर्पिओसोबत दिसलेली इनोव्हा कार मंगळवारी संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस यांनी बुधवारी (दि. 10) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या इनोव्हा गाडीबाबत आपल्याकडे काही माहिती आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले की, एटीएसला ती गाडी कुठे आहे याची माहिती मिळाली आहे. मला वाटत त्यासंबंधी ते कारवाई करतील. त्यांच्या माहितीआधी ती गाडी तिथून गायब झाली तर वेगळी गोष्ट आहे. पण त्यावर मी अधिकृतपणे काही बोलू शकत नाही. कारण मी कोणत्याही तपासयंत्रणेचा व्यक्ती नाही. जी माहिती माझ्याकडे येत मी तुमच्यासमोर मांडत असतो. पण माझ्या माहितीनुसार मंगळवारी (दि. 9) संध्याकाळपर्यंत ही गाडी मुंबईतच होती. दरम्यान इनोव्हाची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तब्बल 800 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. तसेच 30 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले असल्याचे समजते.