भाजपची खुली ऑफर … अधीर रंजन यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे नेहमी खुले

कोलकाता : पोलिसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. तृणमूलच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपमध्ये अजूनही इनकमिंग सुरुच असून भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी थेट लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर देण्यात आली आहे.

काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान होत नाही, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. त्यांच्यासाठी भाजपची दारे कधीही खुली आहेत, त्यांनी यावर विचार करून भाजपमध्ये प्रवेश करावा असे आवाहनही दिलीप घोष यांनी केले आहे. दिलीप घोष म्हणाले की, काँग्रेसमधील अधीर रंजन हे बडे नेते आहेत. त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जात नाही. ही चांगले नाही.अधीर बाबू आमचे जुने-जाणते नेते आहेत. राजकारणातील ते वरिष्ठ व्यक्ती आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचा अनादर होणे हे दुर्दैव आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी युती केली असून, त्यात आता प्रक्षोभक वक्तव्याने वादात सापडणारे मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे.