निलेश राणे यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले- ‘संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले अन् गर्दी करून परतले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणा-या ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या भोव-यात असलेले वनमंत्री संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले अन् गर्दी करून फिरले त्यावेळी कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळ माफ आहे, असा हल्लाबोल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड 15 दिवसानंतर मंगळवारी (दि. 23) यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. संजय राठोड यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे. पोहोरादेवी गडावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परीषद घेतली. पत्रकार परिषदेची सुरुवातच राठोड यांनी पूजा चव्हाणचे नाव घेऊन केली आणि आपली बाजू मांडली. यावेळी जमलेल्या गर्दीवरून निलेश राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे.

दरम्यान सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न राठोड करत आहेत, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.