भाजपचा CM ठाकरे अन् शरद पवार यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली अन् पवार साहेबांना बारमालकांची काळजी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (दि. 12) लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढला. सामान्य माणसा तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझ लाईटबिल तूच पाहा; पवार साहेबांना बारमालकांची काळजी अन् मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची असे म्हणत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.

उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सामान्यमाणसा, नोकरदारा, बलुतेदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझं लाईटबिल तूच पाहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारमालकांची काळजी घेतली आहे., तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाही. वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे. सामान्य माणसा तूच तुझा वाली आहे असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान गेल्या महिनाभरापासून राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. एप्रिल महिन्यात 68 हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णवाढ घटून 40 हजारांपर्यंत आली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा ठाकरे सरकारने केला आहे.