राम मंदिर आंदोलनात राजकीय घुसखोरी करणाऱ्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी, आ. शेलार यांचा शिवसेनेला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली होती. त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी झाली होती. आता त्यांच्याच डोळ्यात रामवर्गणी खुपत आहे, राम भक्त हो ! असे म्हणत मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवण्यांना स्वत:च्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?, असा जोरदार टोला भाजप नेते आमदार आशिष शेलार (BJP leader MLA Ashish Shelar) यांनी शिवसेनेला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून जमा केल्या जाणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. राम मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. वर्गणी जमा करण्याच्याचे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यावर आ. शेलार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार शेलार यांनी ट्विट करत सेनेला टोला लगावला आहे. राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधु ते कारसेवक किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत, असे ट्विट शेलार यांनी केले आहे.