दक्षिणेत पंतप्रधान मोदींची लाट का नाही?; जेपी नड्डा यांचे स्पष्टीकरण

चेन्नई : वृत्तसंस्था – देशात एकूण ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकांमध्ये त्या-त्या ठिकाणचे पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप आपापली ताकद पणाला लावत आहेत. विजयरथाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भाजप कंबर कसून तयारीला लागले आहे. यामध्ये दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारला असता, त्यांनी आता ही परिस्थिती राहिलेली नाही. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही भाजप चांगली कामगिरी करत आहे, असे उत्तर दिले.

भाजपचा विजयरथ हा दक्षिण भारतात अडला आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, पूर्वी असे घडत होते. मात्र, आताची परिस्थिती तशी उरली नाही. दक्षिण भारतातीलसुद्धा भाजपकडून चांगली कामगिरी करण्यात येत आहे. तेलंगणा येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. तसेच हैदराबाद नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, असेसुद्धा जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीत सांगितले.

पुद्दुचेरीत भाजपचे सरकार येईल
आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजप केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे चांगली कामगिरी करेल. जेपी नड्डा यांनी पुद्दुचेरीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. केरळमध्ये २०१९च्या निवडणुकीत भाजपला चांगले यश आले होते. आताच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे. सर्व पक्ष भाजपविरोधात मैदानात उतरले आहेत. तरीही भाजप चांगली कामगिरी करेल, अशी आशा जेपी नड्डा यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूक म्हणजे भाजपला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. तामिळनाडूतील राजकारणात भाजपची प्रतिमा आता बदलली असून, ती सकारात्मक बनली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बऱ्याच योजना तामिळनाडूमध्ये यशस्वीरित्या अमलात आणल्या आहेत. असे सांगत पंतप्रधान मोदी विकासाचे राजकारण करत आहेत. तुष्टीकरणाचे नाही. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, असाच पंतप्रधान मोदींचा मंत्र आहे. हाच अजेंडा दक्षिणेतील विधानसभा निवडणुकांमधून पुढे नेला जाईल, असे जेपी नड्डा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.