BJP Rajya Sabha Candidate | प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी ! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘भाजप’चा प्रश्‍न सोपा झाला

लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक की संजय काकडे?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Rajya Sabha Candidate | राज्यसभेसाठी भाजपने पुण्यातून माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना उमेदवारी दिल्याने शहरातील विशेषत: भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार व माजी शहरअध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्यामधील उमेदवारीची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.

राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या ६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत असून उद्या अर्थात १५ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पाच तर कॉंग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा एक उमेदवार हमखास विजयी होणार आहे. दरम्यान भाजपने आज तीन उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत डॉ. अजित गोपछडे आणि कोथरूडच्या माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ‘आज का आनंद’ने व्यक्त केली. ती खरी ठरली आहे. यामुळे राजकिय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपने पुर्वीपासून पुण्यातून लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेवर ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. परंतू खासदार गिरीश बापट आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या समाजाचे प्रतिनिधीत्व राहीले नाही. भाजपने मध्यप्रदेशमधून राज्य सभेवर पाठविलेेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचेही सदस्यत्व संपुष्टात येत असल्याने भाजपकडून आगामी लोकसभा अथवा राज्यसभेवर ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. ती खरी ठरली असून जावडेकर यांना पुन्हा संधी देण्याऐवजी पक्षाने केरळमध्ये पक्ष कार्यासाठी नियुक्त करतानाच प्रा. कुलकर्णी यांच्या रुपाने ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व दिल्याचे बोलेले जात आहे.

प्रा. कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी दिल्याने पुणे लोकसभेसाठी धडाकेबाज तयारी करणारे पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांची संधी धूसर झाल्याचे बोलले जात आहे. मुळचे नारायण पेठेतील असलेले देवधर ब्राम्हण समाजाचे नेतृत्व करत असून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी त्रिपुरासह दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्ष विस्ताराचे काम केले आहे. परंतू राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये सुरू झालेला कलह तसेच देवधर यांचे कट्टर हिंदुत्व यामुळे शहर भाजपमध्येच देवधर यांच्याबद्दलची नाराजी लपून राहीलेली नाही. अशातच प्रा. कुलकर्णी यांच्या रुपाने ब्राम्हण चेहेरा दिल्याने शहरातील परिचित आणि येथे काम केलेल्या पदाधिकार्‍यालाच संधी मिळण्याची शक्यता कार्यकर्तेच व्यक्त करत आहेत. ब्राम्हण समाजातील उमेदवार नाकारल्याने कसबा पोटनिवडणुकीमध्ये बसलेला फटका पाहाता शिर्षस्थ नेतृत्व देखिल लोकसभेसाठी उमेदवारी देताना ‘रिस्क’ घेण्याची शक्यता कमीच असल्याचे कार्यकर्ते जाहीरपणे बोलत आहेत.

यामध्येही माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होउ शकते. हे तीनही इच्छुक मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. सामाजिक बॅलन्स साधण्यासाठी भाजपकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, असे एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले.

विजया राहाटकर यांना डावलले!

राज्यसभेसाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राष्ट्रीय महीला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया राहाटकर यांच्या नावावर एकमत झाले होते. शहर व राज्य भाजपातील मोठ्या नेत्यांनीही राहाटकर यांच्या नावाला पसंती दिली होती. परंतू ऐनवेळी सूत्रे फिरली आणि प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहीती भाजपतील सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, प्रा. कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाल्याचे कोथरूड आणि मध्यवर्ती शहरातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून पक्षाने ‘न्याय’ दिल्याने आनंद व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB-Bribe Demand Case | बिल्डरकडे लाच मागितल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातील योगेश पाटील यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Nana Patole Criticised BJP | काँग्रेसची भाजपावर खोचक टीका, ”नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी, निष्ठावंतांना डावलले”

Pune Police Inspector Transfers | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा रूद्रावतार ! लोणीकंद आणि हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी