काय सांगता ! होय, चक्क मटणावरून भाजपा कार्यकर्ते भिडले, तुंबळ हाणामारीत 9 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मटणावरून भाजप कार्यकर्त्यांन मध्ये वाद झाल्याच्या चर्चा होत आहेत. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. झारखंडमधील जमशेदपूरजवळील डिमना तलाव परिसरात स्थानिक भाजपा नेत्यांनी आयोजित केलेल्या सहलीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कुमार यांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना शांत केलं.

डिमना तलाव परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहलीमध्ये भाजपाने अनेक कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी तेथे मटण वाटपावरुन वाद झाला. नंतर सहलीच्या ठिकाणाहून साकची येथे आल्यावर या दोन गटांमध्ये हाणामारी झाली.

नेमकं काय घडलं ?
तिथून वाद मिटल्यानंतर साकची येथील शितळा देवी मंदिराजवळ दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. त्यावेळी रस्त्यावर या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये काठ्या, सळयांनी हाणामारी झाली. अचानक सुरु झालेल्या या तुंबळ हाणामारीमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साकची पोलीस घटनास्थळी पोहचले आणि दोन्ही गटांची हाणामारी थांबवली. मात्र पोलीस पोहचेपर्यंत दोन्हीकडील नऊ कार्यकर्ते जखमी झाले होते.

या वादात एका गटातील साकची विभागाचे अध्यक्ष ध्रुव मिश्रा, शंकर प्रसार, हेमंत साहू आणि अजय साहू जखमी झाले. या पैकी शंकरला गंभीर जखम झाली आहे. दुसऱ्या गटातील भाजपा युवा मोर्चाचे सोशल मिडिया प्रमुख माँटी अग्रवाल, सोनू गोस्वामी, सौरव सिंह आणि बाँके सिंह हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथेही दोन्ही गटांमध्ये वाद झाला. येथे काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन वाद शांत केला.

दुसऱ्या गटाचे म्हणणे काय होते
सहलीमध्ये जेवणाच्या वेळी हेमंत साहू आणि ध्रुव यांनी मटण लपवून ठेवले होते. “आपण मटणाची मागणी केली असता आपल्याला हेमंत आणि ध्रुव यांनी शिव्या दिल्या. त्यानंतर आम्ही तिथून निघून आलो. आम्ही शितळा देवी मंदिराजवळ बोलत उभे असतानाच अचानक ध्रुव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला.,” असं माँटीचे म्हणणे आहे. असे माँटी अग्रवाल यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नेता कमलेश साहू एमजीएम रुग्णालयात आणि साकची पोलीस ठाण्यात पोहचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

“आम्ही या सहलीनंतर महिला कार्यकर्त्यांना घेऊन तीन गाड्यांमधून परत जाताना साकची येथील शितळा मंदिरजवळ गाडी थांबवली. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. तितक्यात तिथे माँटी अग्रवालबरोबर त्याचे काही सहकारी काठ्या-लाठ्या, सळया घेऊन आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केले. या हल्ल्यामध्ये आमचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले. शंकर प्रसाद यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. आम्ही तिथून पळ काढत मी एका दुकानामधून साकची पोलिसांना फोन करुन तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले,” असं ध्रुव यांनी सांगितलं आहे. माँटी अग्रवालबरोबरच हल्ला करणाऱ्यांमध्ये सोनू गोस्वामी, मनोज वाजपेयी, सौरव कुमार, गगन वाजपेयी, बाँके सिंह या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आमच्यावर हल्ला करण्यासाठी ते पूर्व तयारी करुन शितळा देवी मंदिराजवळ दबा धरुन बसले होते, असा आरोप ध्रुव यांनी केला आहे.

ध्रुव यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्र्यांच्या वतीने रविवारी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जेवण वाटपाची जबाबदारी हेमंत साहू पाहत होते. यावेळी तेथे आलेल्या माँटी अग्रवालने हेमंत यांच्यावर कूपन्स फेकत जेवण देण्याची मागणी केली. मात्र ज्या पद्धतीने माँटीने कूपन्स दिले त्यानंतर हेमंत यांनी जेवण देण्यास नकार दिली. त्यानंतर माँटीने हेमंत यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर मध्यस्थी करुन त्यांना शांत करण्यात आलं.

फेसबुक पेज लाईक करा –