पुरंदरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार ! जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शासकीय गोदामातून धान्य घेऊन निघालेला ट्रक निश्चित ठिकाणी न जाता भलत्याच ठिकाणी जात असल्याने या ट्रक चालकावर जेजुरी पोलिसात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी बाळू भिवा मदणे रा. सासवड, कुडीतनाका ता. पुरंदर जि. पुणे याने दि.२१ मे रोजी दिवे येथील शासकिय धान्य गोदाम येथे गोदामपाल सुनिल सदाशिव ढमाले यांनी टेम्पो नं. एम. एच.१४ – सी.पी. ३८८५ या मध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २०० पोती गहू, १०० क्विंटल याची एकूण रक्कम २ लाख रूपये आहे, तर ५० किलो वजनाच्या १३३ पोती तांदूळ, एकूण वजन ६५.५ क्विंटल ज्याची किंमत रूपये १ लाख ९९ हजार ५०० रुपये असा एकूण ३ लाख ९९ हजार ५०० रूपये किमतीचा रेशनिंगचा मालाचा टेम्पो चालक बाळू भिवा मदणे याचे ताब्यात दिला होता. तो माल त्याने सासवड येथील ए. बी. माने व रिजवान अक्तर बागवान यांचे रेशनिंग दुकानावर खाली करणे अपेक्षित असताना त्याने ते तिथे खाली न करता ट्रकचा मार्ग बदलुन जेजुरी येथे घेवुन गेला असल्याचे आढळुन आले. याबाबतची तक्रार पुरवठा अधीक्षक सुधीर बबन बडधे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे.

पुरंदर तालुक्यामध्ये रेशन धाण्याचा कळाबजार होण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. जेजुरी येथील एका गोदामात या धान्याचे पॅकिंग बदलून ते काळ्या बाजारात नेहमीच विकले जाते. मात्र महसूल प्रशासनातील पुरवठा विभाग नेहमीच जानीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करीत आला आहे. आताही पोलिसांनी २१ मे रोजी पकडलेल्या या ट्रकवर रितसर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरवठा विभागाने दोन दिवस लावले आहेत. त्यामुळे तालुक्यातील पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे रोजगार बुडालेले अनेक लोक आता रेशन दुकानं समोर रांगेत उभे असलेले पाहायला मिळतायत. मात्र काळा बाजार करणारे असे लोक या परिस्थितीतही संधी शोधत आहेत. अशा लोकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे खाटपे म्हणाले.