रक्तसंकलन करून तेरणा समूहाच्या कर्मचाऱ्यांनी जपले समाजभान

पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक बांधीलकी संभाळताना अनेक नागरिक विविध प्रकारचे दान करत असतात. पण यात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असूनही आपल्याकडे रक्तदात्यांचे प्रमाण फारच कमी आहे. भारतामध्ये रस्ते व इतर अपघातांमध्ये रोज ३२०० नागरिक मृत होतात व यांच्या तीन पट नागरिक गंभीर जखमी होतात व अशा जखमींना रक्ताची खूप गरज असते.

अपघातासोबतच डेंग्यू आणि मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण ढासळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात आणि माफक दरांत रक्त उपलब्ध होत नसल्याने गरीब रुग्ण दगावण्याचे प्रमाणही जास्त आहे. ही अवस्था केवळ ग्रामीण भागातच नाही तर, मुंबई, नवी मुंबई ठाणे, पुणे अशा शहरांतही रक्ताचा तुटवडा पाहायला मिळत आहे. याच सामाजिक प्रश्नाचे भान ठेवून नेरुळ येथील तेरणा समूहातील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या कर्मचाऱ्यांनी १ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या तेरणा समूहाच्या स्थापना दिनानिमित्त ३५ बाटल्या रक्त संकलन करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

सेलिब्रेशन करताना जर आपण सामाजिक भान ठेवले तर समाजातील अनेक समस्यांसाठी आपली मदत खारीचा वाटा ठरू शकतो. कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी, कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी या रक्तदानाची गरज असते. रक्ताचा साठा मुबलक व्हावा यासाठी रक्तदात्यांची गरजही तितकीच महत्वाची आहे. आम्ही आरोग्य क्षेत्रात असल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना तेरणा समूहाच्या स्थापना दिनानिमित्त रक्त संकलनाची कल्पना आवडली व त्यांनी या सामाजिक कार्यात उत्साहाने भाग घेतला अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.