Mumbai News : BMC Budget 2021 ! 39 हजार कोटींचं बजेट सादर; मालमत्ता करासह जाणून घ्या 11 महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई महानगरपालिकेचा सन 2021-22 साठीचा अर्थसंकल्प आज (बुधवार) पालिका सभागृहात सादर करण्यात आला. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले होते. मुंबई महापालिकेने यंदा 39 हजार 38 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 16.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी 33 हजार 441 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मालमत्ता करात सरसकट माफी मिळणार का ? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. मालमत्ता करातील सर्वसाधारण करच सध्या माफ आहे. इतर नऊ प्रकारचे कर लागू आहेत. त्यानुसारच सध्यातरी 2019-20 प्रमाणेच मालमत्ता कराची बिले पाठवण्यात येत आहेत. यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

मालमत्ता करातून महापालिकेला 6768.58 कोटी रुपये उत्पन्न मिळेल असे अपेक्षित होते. मात्र, सुधारीत अर्थसंकल्पानुसार आता साडेचार हजार कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होतील, असे चहल यांनी सांगितले. 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या उत्पन्नात 2268.58 कोटींची घट झाली आहे. परंतु, आतापर्यंत केवळ 1199.99 कोटी उत्पन्न जमा झाले आहे. एस.आर.ए कडून महापालिकेला जमीन अधिमूल्य पोटी 648 कोटी व पायाभूत सुविधा विकास आकारामुळे 982 कोटी येणे आहे. तसेच राज्य शासनाकडून विविध कार्यालयांकडून 5274 कोटी येणे बाकी असल्याची माहिती चहल यांनी दिली.

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

1. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी 750 कोटी तरतूद

2.देवनार पशुवध गृहाच्या आधुनिकरणासाठी 30 कोटींचा निधी

3. सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 1339.94 कोटी, मोठ्या जलवाहिन्यांच्या कामासाठी 229.50 कोटी, मिठी नदी प्रकल्पाच्या कामासाठी 67 कोटी रुपयांची तरतूद

4. कोस्टल रोडसाठी 2 हजार कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी 1300 कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करता 1119 कोटी

5. कस्तुरबा रुग्णालयाचे नुतनीकरण करण्यात येणार

6. नवीन इमारतींना अग्नी व जीव संरक्षण व्यवस्था परवानगीच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रस्ताव

7. नर्सिंग प्राध्यापक संवर्गातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी 20 कोटींची तरतूद

8. नायर रुग्णालयात लवकरच 1.5 टेस्ला एमआरआय सुविधा उपलब्ध करुन देणार, यासाठी 17-20 कोटींची तरतूद

9. संसर्गजन्य रोगांसाठी 2030 पर्यंत 100 टक्के बालकांचे लसीकरण करणार

10. लिक्विड ऑक्सिजन टँक उपलब्धतेसाठी कोविड फंडातून 40.30 कोटींची तरतूद

11. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या घरातच करणार, यासाठी 5 कोटींची तरतूद