Disha Salian Death Case : दिशा सालियान मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची याचिका कोर्टानं फेटाळली !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ची एक्स मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) हिच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टानं आता ही याचिका फेटाळली आहे.

दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच सुशांतचाही मृत्यू झाला होता. त्यामुळं दोन्ही केसमध्ये काही समान धागा असू शक्यतो, अशी शंका दिल्लीतील वकील पुनीत दांडा यांनी व्यक्त केली होती. तसंच दिशाच्या केसची सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टानं मात्र ही याचिका फेटाळली आहे. याशिवाय कोणाकडे या प्रकरणी काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावेत, असे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

दिशा सालियान हिनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. दि. 8 जून 2020 (वार सोमवार) रात्री एका बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावर दिशा उपस्थित होती. घटनेच्या बरोबर आधी दिशा मालाड पश्चिम भागातल्या एक बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावर आपल्या होणाऱ्या पतीसोबत होती. 14 मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. घटनेनंतर तिला बोरीवलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आत्महत्येनंतर 11 जून रोजी तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं होतं. त्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या.

दिशानं पब्लिक रिलेशन्स मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिनं सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजरपर्यंतचा प्रवास केला. दिशा सालियान सुशांत सिंह राजपूत व्यतिरिक्त भारती सिंह, रिया चक्रवर्ती, वरुण शर्मा अशा अनेक कलाकारांची मॅनेजर राहिली आहे. बंटी सचदेवा याच्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंट लिमिटेड सोबतही दिशानं काम केलं आहे.