बोपदेव घाटात कारचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, 5 मित्र गेले होते फिरण्यासाठी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बोपदेव घाटात कारमधून फिरण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. पण जागीच एकाचा मृत्यू झाला होता.

कृष्णकांत नंदकुमार कळसे (वय 25, रा. येवलेवाडी टिळेकरनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर योगेश परिहार, चैतन्य गणेश गांधी, प्रथमेश टकले अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथून पुण्यात येत होते. पाचहीजण मित्र आहेत. ते फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पुण्यात येत असताना उतारावर आल्यानंतर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार पलटी झाली. यात कळसे याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळताच महिला उपनिरीक्षक गपाट तसेच रात्र गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्ण वाहिक बोलवत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान हा अपघात इतका भयानक होता की कारचा चुराडा झाला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.