बुलढाणा : चिखली रेप केसमधील 2 आरोपींना फाशीची शिक्षा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – बुलडाण्यातील चिखली बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चिखली येथील एका 9 वर्षीय मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करुन जबर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत या दोन आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली आहे.

आरोपींनी गेल्यावर्षी 27 एप्रिलला रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला स्कुटीवरुन पळवून नेले होते. त्यानंतर स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत बलात्कार केला होता. दरम्यान, तपासाअंती दोषारोप पत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने मुलीस पळवून नेतांना साक्षीदार शिवाजी साळवे, पंच शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनिषा चव्हाण, नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी या साक्षीदारासह पीडीत मूलीचा पुरावा नोंदवण्यात आला. साक्षी पुरावे हे घटनेला पुरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.