थेट शेतकरी आंदोलनात पोहोचला बॉक्सर विजेंदर सिंग, दिला खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बॉक्सर विजेंदर सिंग देखील रविवारी (दि. 6) आंदोनलस्थळी धाव घेत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शेतक-यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तसेच कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मला दिलेले राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याचा इशारा विजेंदर सिंगने दिला आहे. खेलरत्न पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज सलग 11 वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी थंडीत गेल्या 11 दिवसांपासून दिवसरात्र ठिय्या मांडून बसले आहेत. सिंघू सीमेवर जाऊन बॉक्सर विजेंदर सिंगने शेतक-यांना पाठिंबा दर्शवला आहे.

पुरस्कार वापसीची मोहीम
विजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबीर कौर यांचा समावेश आहे.

बुधवारी पुढील बैठक
शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या बैठकांमध्ये आतापर्यंत काहीच तोडगा निघालेला नाही. शनिवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेली पाचवी बैठक देखील निष्फळ ठरली. आता 9 डिसेंबर रोजी पुन्हा चर्चा होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केले आहे.