रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी ‘बीआरएसपी’चा रास्तारोको

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मूल- चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्ता नियमांना डावलून खोदण्यात आला. या महामार्गामुळे मूल -चंद्रपूर या मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहे. याच रस्त्यावर कित्येक मोठे अपघात होऊन काही जणांचे जीव गेले. रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषण होत असून, याकडे संबंधित विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. यापूर्वी राजू झोडे यांनी बीआरएसपीच्या माध्यमातून निवेदन दिले होते. परंतु, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सबंधित अधिकारी व कंत्राटदाराच्या संगणमताने कोणतीही शासनाची परवानगी नसताना हा मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. प्रवाशांचे व सामान्य नागरिकांचे हाल रोखण्यासाठी शनिवारी महामार्ग रोखून तीव्र निषेध करण्यात आला. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची जोरदार मागणी राजू झोडे यांनी यावेळी केली. यावेळी तहसीलदार व राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता यांनी महामार्गाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर संबंधित कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र निषेध करण्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनात बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, मनीष पुणेकर, तालुका अध्यक्ष शैलेश वनकर, सुजित खोब्रागडे, काजू खोब्रागडे, नागेश दुधबळे, बालाजी सातपुते, अमोल नामेवार,अक्षय नामोलवार, विश्वास कोल्हे, इरफान पठाण, छोटू आकबत्तलवार, अनिकेत वाकडे, नागेश दुधबडे, बालाजी सातपुते, अजय मेश्राम, बंडू निमगडे, सूरज देवगडे, रितीक चोखांन्द्रे, रोहीत शेंडे, सोहन दहीलकर, आकाश दहीवले, आकाश येसनकर, अजय दहीवले, आंनद येसनकर, वतन चिकाटे व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.