…तर महाराजांचे प्राण वाचले असते

इंदूर : वृत्तसंस्था

आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी भय्युजी महाराज हे इंदूरहून पुण्याकडे निघाले होते. परंतु, त्यांनी अर्ध्या रस्त्यातूनच पुन्हा इंदूरला जाण्याचा निर्णय घेतला. जर त्यांनी प्रवासाचा बेत रद्द केला नसता तर कदाचित त्यांचे प्राणही वाचले असते, असे आता बोलले जाऊ लागले आहे.

आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे ११ जूनला भय्युजी महाराज आपल्या मोटारीने पुण्याकडे निघाले होते़ त्याचवेळी पुण्यातील आश्रमातील सेवेकरी अमोल चव्हाण हे त्यांना वारंवार फोन करीत होते. पोलिसांनी काढलेल्या कॉल डिटेल्स वरुन हे स्पष्ट झाले आहे. वासादरम्यान त्यांचे अमोल यांच्याशी जवळपास ३० मिनिटे बोलणे झाले. विशेष म्हणजे अमोलचा फोन आल्यावर ते गाडी थांबविण्यास सांगून चालक व बरोबरच्या सेवेकऱ्यांना बाहेर जाण्यास सांगत व त्यानंतर त्यांच्याशी बोलत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आले आहे. या प्रवासादरम्यान अमोलबरोबर त्यांची पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू यांचेही फोन आले़ त्या तिघांशी बोलणे झाल्यानंतर महाराजांची अचानक पुण्याला जाण्याचा बेत रद्द केला आणि ते अर्ध्या रस्त्यातून इंदूरला परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी आत्महत्या केली होती.

जर महाराजांनी पुण्याला येण्याचा निर्णय बदलला नसता तर त्यांनी पुण्यातील डॉक्टरांकडून कदाचित उपचार करुन घेतला असता़ त्यामुळे त्यांचे प्राणही वाचू शकले असते असे आता बोलले जाऊ लागले आहे.