आता विदेशी चलन ‘ऑनलाइन’ देखील मिळणार !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – विदेशी चलन आता लवकरच ऑनलाइन मिळणार आहे. विदेशी पर्यटक व  व्यावसायिकांना संबंधित देशाचे चलन ऑनलाइन पद्धतीने विकत घेता येईल. यासाठी क्लीअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिजिटल मंच तयार केला  आहे.  ही सुविधा ऑगस्टपासून सुरु होणार असून या व्यवहारासाठीचे शुल्क इंटरबँक रेटप्रमाणेच असेल. किरकोळ व असंघटित ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून विदेशी चलनाची खरेदी व विक्री करता यावी यासाठी एक विशेष पोर्टल असावे असा प्रस्ताव आरबीआयने २०१७मध्ये मांडला होता.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार,  ऑनलाइन माध्यमातून विदेशी चलनाची खरेदी व विक्री करता यावी यासाठी क्लीअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिजिटल मंच तयार केला असून त्याची सध्या चाचणी सुरू आहे. ऑगस्टपासून या पोर्टलवरून विदेश चलन खरेदी-विक्री सुविधा सुरू होईल. या ऑनलाइन मंचामुळे विदेशी चलन खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता वाढेल. या ऑनलाइन सुविधेसाठी एक जुलैपासून ग्राहकांची नोंदणी सुरू होणार आहे.

सध्या  काही बँका, फॉरेन एक्स्चेंजेस व काही संस्था विदेशी चलनाची खरेदी व विक्री करतात. यामध्ये  १ ते ३ टक्के शुल्क आकारले जाते. तूर्तास विदेशी चलन देणाऱ्या बँकांकडून त्यांच्या सर्व बँकांतील हे चलन एकत्र केले जाते व या चलनांचा व्यवहार करणाऱ्या संस्थांमध्ये त्याचा लिलाव केला जातो.