आयुर्वेदिक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी का ? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने आक्षेप नोंदवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक चिकित्सकांनी (डॉक्टर) शस्त्रक्रिया करावी का असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

‘सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ ही संस्था केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारित येते. या संस्थेने 19 नोव्हेंबरला एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार आयुर्वेदिक चिकित्सकांना 58 प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली होती. यावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध दर्शवला. तसेच आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणार्‍या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचेही असोसिएशनने म्हटले.

दरम्यान, जर आयुर्वेदिक चिकित्सकांना शस्त्रक्रियेची परवानगी दिली तर रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, अशी बाजू ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे वकील मनिंदर सिंह यांनी मांडली आहे. तसेच लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असून, यात कुठलीही हयगय होता कामा नये, असेही ते म्हणाले.