दोन मास्क घातल्याने कोरोना व्हायरसविरूद्ध दुप्पट सुरक्षा मिळू शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की दोन मास्क घातल्याने कोरोना व्हायरस विरूद्धची सुरक्षा दुप्पट होऊ शकते. हा खुलासा जामा इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की दोन फेस कव्हर घातल्याने कोरोना व्हायरसच्या आकाराच्या कणांना गाळण्याचा प्रभाव सुमारे दुप्पट होऊ शकतो.

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) चे सुद्धा हेच म्हणणे आहे. त्यांचा सल्ला आहे की, कोविड-19 पासून चांगली सुरक्षा हवी असेल तर आता लोकांनी एक नव्हे तर दोन फेस मास्क घालावे.

सर्जिकल मास्कच्या वर कपड्याचा मास्क

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउची यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. यासाठी जार नाक आणि तोंडाला योग्य पद्धतीने झाकले तर व्हायरसविरूद्ध पूर्ण सुरक्षा मिळेल. सीडीसीचा हा सुद्धा सल्ला आहे की, दोन लेयरच्या कपड्याने बनवलेल्या मास्कने सुद्धा बचाव होऊ शकतो. डबल लेयर मास्क श्वासासोबत बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स किंवा छोट्या कणांना हवेत पसरण्यापासून रोखतो. विशेषकरून, विमान प्रवासात कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो.

अशा स्थितीत डबल लेयर मास्क महत्वाचा आहे. संशोधकांनी विनंती केली आहे की, जिथे डिस्टन्सिंगचे पालन करणे अवघड आहे, तिथे सर्जिकल मास्कच्या वर कपड्याचा मास्क घालू शकता. मास्क चांगल्याप्रकारे फिट असावा आणि ढिला नसावा.