Pune News : ‘हा’ वाडा होतोय इतिहासजमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – परिवर्तन अटळ आहे, असे कितीही ठासून मनाला पटवण्याचा प्रयत्न केला तरी, त्या क्षणाला सामोरे जातांना अनेकांच्या अश्रूचे बांध आवरत नाहीत. जुना वाडा पाडला जात असताना पुण्यातील रहिवाशांची अशीच अवस्था झाली होती. मंडईच्या झुणका भाकर केंद्राजवळील लंकेवाडा (69 शुक्रवार पेठ) अशाच परिवर्तनाच्या वाटेवर अंतिम घटका मोजतोय. मुळा- मुठेच्या काठची पुनवडी, कौलारू घरे, सरदारांचे वाडे, बाराबलुतेदारांच्या चाळी, वस्त्या, नोकरदारांची घरे, ओनरशिप फ्लॅट, टाऊनशिप आता स्मार्ट सिटीच्या वाटचालीचा एक साक्षीदार.

पुण्यातील मोजक्या शिल्लक अस्तित्वातील चाळीपैकी हा वाडा साधारणपणे 1880 च्या दशकातील आहे. दुमजली, भव्य दरवाजा आणि दहा बाय दहाची सुमारे 35 घरे आणि सहा दुकाने इथे होती. लंके, ताराचंद आणि मंडई मंडळाकडे कालपरत्वे या वाड्याची मालकी होती. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील मेट्रोच्या स्थानकासाठी हा वाडा आरक्षित असून सर्व स्थानिकांचे रितसर स्थलांतर होत आहे. नुकताच या वाड्यातील निवासी मंडळीचा निरोप सोहळा झाला. त्यावेळी अनेकांच्या आठवणीचे बांध मुक्त झाले. ही सर्व मंडळी आता वडगाव धायरीतील जाधवनगरमध्ये मुक्कामी जात आहेत.

या लोकवाडयाची स्वतःची खासियत होती. कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या चार पिढ्या इथे गुण्या गोविंदाने नांदल्या. घरे छोटी आणि मने मात्र मोठी अशा वातावरणात पुढील पिढ्या शिक्षित झाल्या आणि मंडई विद्यापीठाचे नाव सार्थ केले. काही काळ अवैध धंद्याचे सावट असले तरी अनेकांनी निर्व्यसनी राहून लौकीक जपण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रात ठसा उमटवला. घराघरात आर्थिक चणचण अबोल होती. पण त्याचा गाजावजा कधीच झाला नाही. समाजाच्या तळागळातील या माणसांनी जातीपाती व्यतिरिक्त फक्त शेजारधर्म जीवापाड जपला. तीच खरी खासियत होती. वाडा पाडायला आता सुरुवात होत आहे. जीर्णतेला, नवसंजीवनीचे वरदान मिळेल, पण तेथील मायेच्या वास्तव्याने जिव्हाळ्याने जपलेले क्षण मात्र प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत, हे मात्र नक्की.