सीबीआयच्या मुख्यालयावरच छापा; इमारत सील 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागात (सीबीआय) उच्चपदस्थांमध्ये उफाळलेला संघर्ष दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आज पहाटेपासूनच सीबीआयने नवी दिल्लीतील त्यांच्याच मुख्यालयात छापे मारले आहेत. सीबीआय मुख्यालयाची इमारत सील करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला इमारतीत जाण्यास प्रतिबंध लावले आहेत. अधिकाऱ्यांची एक टीम इमारतीत उपस्थित असून सर्व कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. विशेष म्हणजे सीबीआयने त्यांच्याच कार्यालयावर छापा मारण्याची ही पहिलीच घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश्वर राव यांच्या नेतृत्वात हा छापा टाकण्यात आला आहे. सीबीआय मुख्यालयातील १० वा आणि ११ वा मजला सील करण्यात आला आहे.  विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात दाखल एफआयरचा तपास करणारी टीम बदलण्यात आली असून डीआयजी मनोज सिन्हा यांनादेखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

सीबीआयचे विशेष संचालक आणि दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय एजन्सीचे पोलीस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर अस्थाना यांनीही वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वर्मा आणि अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यांच्याजागी सीबीआयचे संयुक्त संचालक नागेश्वर राव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.

नागेश्वर राव यांनी आज त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी तात्काळ कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. सीबीआयने आज सीबीआय मुख्यालयातीलच १० वा आणि ११ वा मजला सील केला असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. सीबीआयच्या इतिहासात प्रथमच त्यांचं मुख्यालय सील करण्यात आलं आहे. या दोन्ही मजल्यावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे नष्ट केली जावू नयेत, म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं सीबीआय सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, या केसची चौकशी करण्यासाठी सीबीआयमधील अधिकाऱ्यांची टीम बदलण्यात येणार आहे. राकेश अस्थाना आणि आलोक वर्मा यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.