सेलिब्रिटी ट्विट केस : महाराष्ट्र सरकारचा दावा – तपासात BJP आयटी सेल प्रमुखाचे नाव आले समोर

मुंबई : सेलिब्रिटी ट्विटचा तपास करत असलेल्या महाराष्ट्र सरकारने अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की, तपासात भाजपा आयटी सेलचा प्रमुख आणि 12 इन्फ्लुअ‍ॅन्सरची नावे समोर आली आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख प्रथमच मीडियाशी बोलत होते.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की, त्यांनी कधीही म्हटले नव्हते की, सेलिब्रिटींची चौकशी होईल. देशमुख म्हणाले, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ते सादर करण्यात आले. लता मंगेशकरजी आमच्यासाठी देव आहेत, संपूर्ण जग सचिन तेंडुलकरचा सन्मान करते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले, आम्ही भाजपा आयटी सेलच्या भूमिकेचा तपास करत आहोत, त्यांच्या प्रभावाखाली ट्विट करण्यात आले होते किंवा नाही? याचा तपास करत आहोत. मोठा खुलासा करत अनिल देशमुख यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात भाजपाचे आयटी सेल प्रमुख आणि 12 इन्फ्लुअ‍ॅन्सरची नावे समोर आली आहेत.

काय आहे पूर्ण प्रकरण
शेतकरी आंदोलनाबाबत बॉलीवुडच्या अनेक दिग्गज, क्रिकेटर्ससह खेळ जगतातील काही मान्यवर लोकांकडून ट्विट करण्यात आली होती. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आरोप केला होता की, भाजपाच्या दबावात प्रसिद्ध व्यक्तींकडून ट्विट करण्यात आली. या आरोपाच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने तपासाचे आदेश दिले होते.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आरोप केला होता की, अक्षय कुमार आणि सायना नेहवालने एकसारखीच ट्विट केली होती. आम्हाला वाटते की, या पाठीमागे भाजपा आहे. सुनील शेट्टीने एका भाजपा नेत्याला टॅगसुद्धा केले आहे, जे भाजपाची भूमिका उघड करते. भाजपची बीसीसीआयमध्ये सुद्धा भूमिका आहे आणि यासाठी काही क्रिकेटर्सने सुद्धा एकाच दिशेने एकसारखी ट्विट केली होती.

या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते की, या दिग्गजांची ट्विट कुणाच्या दबावात समोर आली आहेत का? आमच्या इंटेलीजन्स एजन्सीज हे प्रकरण हाताळतील. अक्षय कुमार आणि सायना नेहवालचे ट्विट एकसारखेच होते, हेदेखील पाहिले जाईल. भाजपा नेत्याला टॅग करणार्‍या सुनील शेट्टीचे ट्विट सुद्धा आमच्या समोर आहे आणि आता प्रकरणाचा तपास केला जाईल.