काय सांगता ! होय, भंगारातून मध्य रेल्वेला तब्बल 225 कोटींची कमाई

पुणे : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे आर्थिक बाजू भक्कम करण्याचे सर्वजण प्रयत्न करत असल्याचे दिसते. मध्य रेल्वेनेही कोरोनाकाळातील नुकसान भरून काढण्यासाठी भंगारात निघालेल्या वस्तूची विक्री केली आहे. त्यामधून तब्बल २२५ कोटी रुपयांची कमाई मध्य रेल्वेने केली आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही विक्री कमी असली तरी बंद काळात झालेले नुकसान किंचित भरून निघेल.

मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने ‘झिरो स्क्रॅप मिशन’ हाती घेतले होते.त्यानुसार मध्य रेल्वेचा प्रत्येक विभाग, कार्यशाळा, शेड आदी ठिकाणी जमा होणारे भंगार, बदलण्यात आलेले रूळ, अनेक वर्षांच्या वापरानंतर मोडीत निघालेले डबे, वाघिण्या त्याचप्रमाणे वयोमान पूर्ण झालेले इंजिन हे सर्व भंगार विकले आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत या विभागाकडून २२४.९६ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेला भंगारात निघालेल्या वस्तूच्या विक्रीमुळे केवळ कमाईच होत नाही तर इतर कामांसाठी अतिरिक्त जागाही उपलब्ध होत असते. २०१९-२०२० या आर्थिक वर्षांमध्ये मध्ये रेल्वेने ५५,०५७ मेट्रीक टन भंगार साहित्याची विक्री केली होती. त्यातून ३२१.४६ कोटी रुपये कमाई झाली होती. कोरोनाकाळातही मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने चांगली कामगिरी केली. कोरोनाळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाडय़ा आणि पार्सल गाडय़ा सुरु होत्या. त्यांच्या इंजिनाची देखभाल, दुरुस्तीसाठी आवश्यक सुटय़ा भागांची उपलब्धता करण्यात या विभागाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पीपीई किट, मुखपट्टी, हातमोजे, जंतुनाशक आदींच्या खरेदीतही महत्त्वाची भूमिका बजावली.