‘या’ सरकारने केले बेरोजगार ब्राह्मण तरुणांना कार वाटप

हैदराबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आता आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सरकारने बेरोजगार ब्राह्मण तरुणांना स्वीफ्ट डिजायर कारचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आणखी एका योजने अंतर्गत १ कोटी ४० लाख स्मार्टफोनचे वाटप करण्याची सरकराची योजना आहे, असे मीडिया रिपोर्ट्स आहेत.
सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यास अद्याप काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे.लोकसभा निवडणुकीचं बिगुल अद्याप वाजलं नसलं तरी राजकीय पक्षांनी लोकप्रिय घोषणांचा धडका लावला आहे. ब्राह्मण तरुणांना ‘स्वयंरोजगार कल्याण योजने’अंतर्गत या कारचे वाटप केले जाईल. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात ५० कारचे वाटप करण्याच्या निर्णयाला आंध्र प्रदेश सरकारने मंजुरी दिल्याचंही सांगण्यात येतंय.
ब्राह्मण समाजातील ५० बेरोजगार तरुणांना सुरुवातीला या कारचे वाटप करण्यात येईल. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वतः या कारची चावी तरुणांच्या हाती सोपवतील.ब्राह्मण विकास महामंडळाकडून कारसाठी जवळपास दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. तर लाभार्थी ब्राह्मण तरुणाला कारसाठी १० टक्के रक्कम भरावी लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरीत रक्कम आंध्र प्रदेश ब्राह्मण सहकारी सोसायटीद्वारे मासिक हप्त्यांनी देण्यात येईल. कर्जाच्या स्वरुपात हे हप्ते असतील.