… तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला : पोलिसांना आदेश

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांचा पाठलाग करताना पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना मंगळवारी जीव गमवावा लागला. त्यांना आज (बुधवारी) शोकाकूल वातावरणात चंद्रूपरच्या पोलिस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी पोलिसांना गुंडाशी आता कठोरपणे वागण्याचा सूचना दिल्या असून अंगावर गाडी घातली तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला असा आदेश दिला आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह पोलिस दलातील अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी चिडे यांना पुष्पांजली वाहतूक श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी हे पत्रकारांशी बोलत होते. यापुर्वी पोलिस नाकाबंदीच्या वेळी शस्त्र बाळगत नव्हते. मात्र, आता आम्ही पोलिसांना नाकाबंदीच्या वेळी शस्त्र सोबत बाळगावे असा आदेश दिला आहे. जर कोणी गुंड अंगावर गाडी घालत असेल आणि त्यामध्ये जीव गमवावा लागणार असेल तर स्वसंरक्षणार्थ गाडी चालवणार्‍यावर गोळया झाडा असे सांगण्यात आले आहे.
जिल्हयातील नागडभड येथे छत्रपती चिडे हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चिडे आणि त्यांचे सहकारी दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांचा पाठलाग करीत होते. त्यावेळी चिडे यांना वाहनाने चिरडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्यांचा मृतदेह चंद्रपुरातील त्यांच्या घरी आणण्यात आला. बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव पोलिस मुख्यालयात आणण्यात आले. त्यांना मानवंदना देण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार विकास महात्मे, आमदार संजय धोटे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. चिडे यांना वाहनाखाली चिरडणार्‍यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा केली जाईल तसेच चिडे यांना शहीदाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगितले. चंद्रूपर जिल्हयात दारूबंदी असताना देखील ही घटना घडल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us