इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमात ‘हडप्पा’ ऐवजी ‘सरस्वती संस्कृती’; शिक्षक- प्राध्यापकांकडून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयोगाने इतिहासाचा पदवी अभ्यासक्रमाचा आराखडा नुकताच जाहीर केला आहे. इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमात आता ‘हडप्पा संस्कृती’ची ओळख ‘सरस्वती संस्कृती’ म्हणून करुन देण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात हा बदल करण्यात आला आहे. आयोगाने केलेल्या या बदलावरुन शिक्षक-प्राध्यापकांनी आयोगावर टीका केली आहे.

देशभरात अभ्यासक्रमात किमान पातळीवर समानता असावी यासाठी आयोगाने जाहीर केलेल्या आराखड्यानुसारच विद्यापीठे अभ्यासक्रम निश्चित करत असतात. मागील अनेक वर्षापासून इतिहासात शिकवण्यात आलेल्या ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सरस्वती संस्कृती’ म्हणून या आराखड्यात करण्यात आला आहे. तसेच वैदिक संस्कृतीच्या समावेशाची सूचनाही करण्यात आली आहे. या मसुद्यात ‘सरस्वती संस्कृती’, वैदिक संस्कृती शिवकवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही नागरीकरणाचे दाखले इतिहासात उपलब्ध नसल्याचे एका प्राध्यापकाचे मत आहे.

एका शिक्षकाने आयोगाच्या या निर्णयावर टीका करताना म्हटले की, प्राचीन भारताचा इतिहास आणि परंपरा याचा विचार करताना फक्त वैदिक साहित्याचा विचार हा संकुचित विचार आहे. अधार्मिक ऐतिहासिक घटकांच्या या आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. वेगवेगळ्या संस्कृती भारतात होत्या. मात्र आर्य संस्कृतीकेंद्री असे या आराखड्याचे स्वरुप दिसत असल्याची टीका केली.

मुंबई विद्यापीठातील एका प्राध्यापकाने मत व्यक्त करताना सांगितले, सरस्वती संस्कृती असे म्हणणे हे ऐतिहासिक संदर्भानुसार चुकीचे असून हा संदर्भ वैदिक साहित्यात येतो. पूर्वी वैदिक साहित्यातील सरस्वती संस्कृतीच्या संदर्भाचा हडप्पा संस्कृतीशी काहीही संबंध नाही. हडप्पा संस्कृतीच्या नागरी परंपरांचा ऱ्हास त्यापूर्वीच हजारो वर्षे झाल्याचे पुरावे आहेत. संस्कृती नष्ट होणे म्हणजे एक नागरी परंपरा नष्ट होणे, अस मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.