शिखर धवन विरोधात ‘चार्जशीट’ दाखल, 6 फेब्रुवारीला होणार निर्णय, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याच्याविरोधात वाराणसी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काहीकाळ विश्रांती घेतलेल्या धवनने नुकतीच वाराणसीला भेट दिली. भेटीदरम्यान वाराणसीत नावेतून फिरतानाचे काही फोटो त्याने पोस्ट केले असून त्यात तो पक्ष्यांना दाणे खाऊ घालताना दिसत आहे. देशात बर्ड फ्लूचे सावट असताना पक्ष्यांना हाताळणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाकडून केले असतानाही धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी वाराणसी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणावर 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाराणसी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले की, धवन नावेतून विहारासाठी गेला होता. त्यावेळी त्याने काही पक्षांना खाऊ घातले. बर्ड फ्लूचे संकट असल्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी आहे. धवनने पोस्ट केलेल्या फोटोत तो पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे आणि शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई केली जाणार आहे. त्या नाविकाने धवनला नियमांबद्दल सांगितले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

धवनने वाराणसीत बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन विशेष अभिषेकही केला. अध्यात्मात तल्लीन झालेल्या धवननं गंगा किनारी जाऊन आरतीत सहभागी होण्याचा आनंदही घेतला होता. वाराणसीत नावेतून फिरतानाचे काही फोटो त्यानं पोस्ट केले होते आणि त्यात तो पक्ष्यांना दाणे खाऊ घालताना दिसत आहे. याच कृतीमुळे त्याने स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे.