स्विगीमधून ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये चक्क वापरेलं बँडेज 

चेन्नई : वृत्तसंस्था – स्विगीमधून ऑर्डर केलेल्या अन्नामध्ये चक्क वापरेलं बँडेज आढळून आलं आहे. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूतील चेन्नईमध्ये  घडला आहे. विशेष म्हणजे या बँडेजवर रक्ताचे डागही दिसत आहेत. बालामुरगन यांनी रविवारी स्विगी अ‍ॅपच्या माध्यमातून एका हॉटेलमधून जेवण मागविले होते. फूड सर्व्हीस कंपनी स्विगीने ही ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवली. मात्र, निम्मं जेवण झाल्यानंतर या जेवणात बँडेज आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच ही बातमी शेअर करताना बालामुरग यांनी ओमिटच्या इमोजीचा वापर केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते. मात्र, या नुडल्समध्ये वापरलेल बँडेज आढळून आल्याच या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. याबाबत संबंधित रेस्टॉरंटला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कुठलंही प्रतिउत्तर मिळाल नाही. याउलट आपण स्विगी अ‍ॅपद्वारेच दुसऱ्यांदा जेवणाची ऑर्डर करण्याचा पर्याय सूचविण्यात आला. मात्र, स्विगीशीही थेट फोनद्वारे संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे केवळ अ‍ॅपद्वारे चॅटिंग करुनच ही तक्रार सांगण्याचा पर्याय माझ्याकडे असल्याचं बालामुरगन याने म्हटले आहे. दरम्यान, स्विगी आणि संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांच्या जेवणाची किती काळजी घेतली जाते, हा खरा प्रश्न आहे. तसेच, जेवण बनवणारे आचारी हँडग्लोज वापरतात का, स्विगीचे कर्मचारीही तशी काळजी घेतात का, असा प्रश्नही या फेसबुक पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

स्विगी अ‍ॅप वापरकर्त्यांनी याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. तर संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाबाबत सतर्क असावे. तसेच स्विगीनेही आपल्या अ‍ॅपच्या माध्यमातून अन्नसेवा पुरविणाऱ्या रेस्टॉरंटची निवड करताना, योग्य ती काळजी आणि खात्री करणे, आवश्यक असल्याचं बालामुरगन यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी अद्याप स्विगीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसून केवळ investigate and get back to me in a day or two असा मेसेज कंपनीकडून आल्याचेही मुरगन यांनी सांगितले.