CM ठाकरे यांनी कधीही ‘बाहुबली’चे राजकारण केले नाही : डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेला संपवू शकतो असा अनेकांना भ्रम होता, राष्ट्रपती राजवट आण्यासाठी महाराष्ट्रात कशी बेबंदशाही सुरु आहे असे वातावरण निर्माण केले होते. त्याला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतपेटीतून चपराक दिली आहे. भाजपच्या विषारी प्रचाराला जनता बळी पडली नाही. या निवडणूकीमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपच्या अपप्रचाराला जनतेने उत्तर दिल्याची टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या यशाबद्दल त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, भाजपने शह कटशहाचे राजकारण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवून विषारी प्रचार केला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कधीही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून निवडून या असे सांगितले नाही. बाहुबलीचे राजकारण केले नाही. आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना ग्रामीण जनतेने साथ दिली आहे. ग्रामपंचायतींप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही शिवसेना आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील काळात ग्रामपंचायतीचे काम कोणतेही हितसंबंध आड येऊ न देता ग्रामविकासासाठी राज्य शासन सर्व ग्रामपंचायतींच्या मागे ठामपणे उभे असेल.

पुण्यात ‘प्रबोधन महोत्सवा’चे आयोजन
ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 20 ते 26 जानेवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात प्रबोधन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवात सहभागी होंणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब दराडे, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती डॉ गो-हे यांनी यावेळी दिली.