काय सांगता ! होय, जग ‘कोरोना’शी लढत असतानाच चीननं एका महिन्यात 268 अब्ज डॉलर कमावले, निर्यातीत 21 % वाढ

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. मात्र, ज्या देशातून कोरोनाची सुरुवात झाली, त्या चीनच्या निर्यातीमध्ये कोरोनाकाळात कमालीची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशामध्ये चीनविरोधात मोहीम सुरू केली होती. चिनी मालावर बंदी घालण्याच्या मागण्यांपासून ते अगदी चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध लागू करण्यापर्यंत अनेक गोष्टी ट्रम्प प्रशासनाने केल्या. मात्र, चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापारामध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. दोन्ही देशांमध्ये ७५.४ अब्ज डॉलरचा वाढीव व्यापार झाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनची एकूण निर्यात २६८ अब्ज डॉलरपर्यंत पोहाेचली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनमधून झालेली निर्यात ही २१.१ टक्क्यांनी अधिक आहे, त्यामुळेच महामारीच्या संकटात चीनने चांगली कामगिरी करत वाढीव व्यापार केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन ग्राहकांकडून चिनी वस्तूंना चांगली मागणी असल्याने निर्यात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी जकात विभागाने एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंची टक्केवारी ४६ टक्क्यांनी वाढली आहे. दरांवरून अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही महिन्यांपासून व्यापारी युद्ध सुरू होते. असं असतानाही ही वाढ आश्चर्यकारक आहे.

ऑक्टोबरमध्ये चीनमधून होणारी निर्यात ११.४ टक्क्यांनी वाढली होती, तर चीनमधील आयातही पाच टक्क्यांनी वाढून १९२.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहाेचली होती. ऑक्टोबर महिन्यात चीनची आयात ४.७ टक्क्यांनी वाढली. या आकड्यांचा नीट अभ्यास केला, तर कोरोना महामारीच्या संकटामधून चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरल्याचे स्पष्ट होत आहे.

चीन बायोफर्मासिटिकल लिमिटेडने सोमवारी काेरोनावैकच्या निर्मतीसाठी मदत करण्यासाठी सिनोवैक लाइफ सायन्स या कंपनीमध्ये ५१५ मिलियन डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या लशीच्या माध्यमातून चीनचा फायझर आणि ऑक्सफर्डच्या लशींना टक्कर देण्याचा विचार आहे. सिनोवैकने इंडोनेशिया, टर्की, ब्राझील आणि चिलीसारख्या देशांमध्ये काेरोना लशीच्या पुरवठ्यासंदर्भातील करार केला आहे.