चीनच्या कोरोना व्हॅक्सीनचा आला ‘रिझल्ट’, पण अमेरिकन लसीपेक्षा कमीच ‘प्रभावी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   चीनच्या एका कोरोना व्हॅक्सीनचा रिझल्ट आला आहे. चीनी कंपनी Sinopharm ची कोरोना व्हॅक्सीन 86 टक्के प्रभावी आढळली आहे. तर, अमेरिकन कंपनी मॉडर्नाची व्हॅक्सीन 94 टक्के प्राभावी आढळली होती आणि फायजरची व्हॅक्सीन 90 टक्के यशस्वी असल्याचे सांगितले गेले होते.

प्रत्यक्षात चीनी कंपनी सीनोफार्माच्या कोरोना व्हॅक्सीनच्या ट्रायल संयुक्त अरब अमीरातमध्ये करण्यात आल्या आहेत. संयुक्त अरब अमीरातनेच बुधवारी माहिती दिली की, चीनी कंपनीच्या व्हॅक्सीनच्या सुरूवातीच्या डेटाद्वारे समजले आहे की, व्हॅक्सीन कोरोना आजारापासून वाचवण्यासाठी 86 टक्के प्रभावी आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, संयुक्त अरब अमीरातच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सीनोफार्माच्या अंतरिम डेटाचे रिव्ह्यू करण्यात आले आहे. सीनोफार्मा चीनची सरकारी कंपनी आहे. ही कंपनी एकुण 10 देशांमध्ये व्हॅक्सीनची ट्रायल करत आहे. इतर देशांचा डेटा अजून जारी करण्यात आलेला नाही.

सीनोफार्मा व्हॅक्सीनच्या डेटाच्या विश्लेषणातून हे सुद्धा समजले आहे की, कोरोनाने गंभीर आणि मध्यम आजारी होण्यापासून वाचवण्यात व्हॅक्सीन 100 टक्के प्रभावी आहे. संयुक्त अरब अमीरातच्या सरकारचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीनचा कोणताही साईड इफेक्टसुद्धा दिसून आलेला नाही.

मात्र, संयुक्त अरब अमीरातच्या सरकारने हे सांगितले नाही की, त्यांनी सीनोफार्माच्या रॉ डेटाचे स्वतंत्र मूल्यांकन केले आहे. चीनच्या तीन आणखी व्हॅक्सीन मोठ्या ट्रायलच्या अखेरच्या राऊंडमध्ये पोहचल्या आहेत. अमेरिकन आरोग्य एजन्सीज आणि डब्ल्यूएचओनुसार, 50 टक्के प्रभावी असली तरी सुद्धा व्हॅक्सीनला मंजूरी दिली जाऊ शकते.