चायनीज कंपनीचा मोठा खेळ, 2 कोटी मोबाइलमध्ये व्हायरस टाकून कोट्यवधी कमावले

बिजिंग : चीनच्या एका कोर्टाने चायनीज स्मार्टफोन मेकर कंपनी जियोनीशी संबंधीत एक मोठा निर्णय सुनावला आहे. या निर्णयानुसार, जियोनी मोबाइलच्या सहयोगी कंपनीने 2 कोटीपेक्षा जास्त डिव्हाईसेसमध्ये जाणीवपूर्वक ट्रोजन हॉर्स व्हायरस टाकण्याचे काम केले होते. या व्हायरसचे काम फोनमध्ये यूजर्सच्या नकळत नको असलेल्या जाहिराती दाखवणे आणि अन्य मॅलिशियस अ‍ॅक्टिव्हिटीजचे होते, ज्याद्वारे कंपनी कोट्यवधी कमावत होती.

अशाप्रकारे टाकला होता व्हायरस
न्यायालयाच्या निर्णयानुसार, 2 कोटीपेक्षा जास्त जियोनी फोन्स डिसेंबर 2018 आणि ऑक्टोबर 2019 च्या दरम्यान एका अ‍ॅपच्या माध्यमातून जाणीवपूर्वक ट्रोजन हॉर्स मालवेयरने संक्रमित केले गेले होते. हे अ‍ॅप कंपनीचे कमाईचे एक टूल म्हणून काम करत होते. हा व्हायरस स्टोरी लॉक स्क्रीन अ‍ॅपच्या अपडेटद्वारे या फोन्समध्ये टाकण्यात आला होता आणि हे काम जियोनीची सब्सिडियरी शेनझेन झिपू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने केले होते.

डिसेंबर 2018 पासून ऑक्टोबर 2019 या कालावधीत ट्रोजन हॉर्सद्वारे कंपनीने 42 लाख डॉलर (सुमारे 31 कोटी रुपये) ची कमाई केली होती. तर, या दरम्यान कंपनीचा खर्च केवळ 13 लाख डॉलर (सुमारे 9.59 कोटी रुपये) झाला होता. 4 अधिकारी अवैधरित्या मोबाइल डिव्हायसेसला नियंत्रित करण्यात दोषी आढळले आणि प्रत्येकाला 2 लाख युआन (सुमारे 22 लाख रुपये) दंडासह 3 ते 3.5 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे.

अगोदरपासून सुरू होता हा खेळ
मोबाइल डिव्हाइसमध्ये जाणीवपूर्वक व्हायरस टाकून कमाई करण्याची पद्धत केवळ जियोनीनेच अवलंबलेली नाही. अनेक चायनीज आणि छोट्या कंपन्या अगोदरपासून असे प्रकार करत आहेत. जियोनी अगोदर इनफिनिक्स आणि टेक्नो सारख्या मोबाइल मेकर कंपन्या सुद्धा अशा प्रकरणात दोषी आढळल्या आहेत.