नाताळनिमित्त तयार करण्यात आला ७५० किलोंचा केक 

दिल्ली : वृत्तसंस्था – नाताळ निमित्त देशभरात ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी नववर्षाच्या  स्वागतासाठी आणि नाताळनिमित्त जोरदार तयारी करण्यात येते. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने या सणाचे स्वागत करतात. ख्रिस्ती बांधवांकडून यासाठी विशेष तयारीही करण्यात येते. तसेच प्रत्येक ठिकाणचे शॉप व मॉल सजवण्यात येतात.
असेच नाताळनिमित्त गुजरातच्या अहमदाबाद येथील मॉलमध्ये ७५० किलो वजनाचा प्लम केक खास तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील या मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. ७५० किलोचा हा केक पाहण्यासाठी अनेकांनी येथे गर्दी केली होती.
नाताळनिमित्त सिक्रेट सँटा हा खेळ अनेक ठिकाणी खेळला जातो. याच खेळात हा केक तयार करून आणण्यात आला होता. केकवर मोठ्या अक्षरात सिक्रेट सँटा असे लिहिण्यात आले होते. तसेच या केकवर सांताक्लॉज आणि आइसमन यांचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सोशल मीडियावरही ख्रिसमसची धूम पाहायला मिळत आहे.