Citibank भारतातून करणार Logout ! कर्मचारी आणि खातेदारांचे होणार काय? जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अमेरिकेतील बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा समूह सिटीग्रुपने भारताला टाटा-बायबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमचे बँक अकाउंट Citibank मध्ये असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. बँकेने भारतात कंज्युमर बँकिंग बिझनेस बंद करणार असल्याचे सांगितले आहे.

सिटी ग्रुपने सांगितले, की आता फक्त 4 देशांतील मार्केटवरच विशेष लक्ष देणार आहे. त्यामध्ये हाँगकाँग, लंडन, सिंगापूर आणि UAE असणार आहे. त्यामुळे भारतातील सर्व व्यवहार बंद केले जाणार आहेत. देशात सिटी बँकेच्या 35 शाखा आहेत. त्यामध्ये सुमारे 4,000 कर्मचारी काम करत आहेत. तर भारतात सिटी बँकेचे तब्बल 29 लाख ग्राहक आहेत. या बँकेत 12 लाख अकाउंट आणि एकूण 22 लाख ग्राहकांकडे सिटीबँकेचे क्रेडिट कार्ड आहे.

खातेदारांचे होणार काय?

सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशू खुल्लर यांनी सांगितले, की आम्ही आमच्या कामात कोणताही तात्काळ बदल केला नाही. त्यामुळे कोणताही तात्काळ परिणाम होणार नाही. आम्ही ग्राहकांना कोणतीही अडचण होऊ देणार नाही. या घोषणेमुळे बँकेची सेवा आणखी मजबूत होईल. सिटी मुंबई, पुणे, बंगलुरू, चेन्नई आणि गुरुग्राम या केंद्रांवरून ग्लोबल व्यवहारांवर लक्ष देत राहणार आहे.

या बँकांनीही भारतात व्यवसाय केलाय कमी

सिटीबँकेशिवाय अशा अनेक बँका आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय भारतात कमी केला आहे. त्यामध्ये बार्कलेज, डॉयच बँक, एचएसबीसी, मॉर्गन स्टेनली, बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच, आरबीएस, स्टँडर्ड चार्टर्ड यांचा समावेश आहे.