3 लाख 12 हजाराची लाच स्विकारणारा ‘नगराध्यक्ष’ अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, राज्यात सर्वत्र खळबळ

मुदखेड (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन- मुदखेड नगर परिषदेतील केलेल्या विविध कामाचा धनादेश देण्यासाठी ३ लाख १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना मुदखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमिरोदीन अन्सारी याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. नगराध्यक्ष अन्सारीसह एका खासगी इसम मोहमद अली मोहमद एजाझ याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज मुदखेड नगर परिषदेत करण्यात आली. नगराध्यक्षालाच लाच घेताना अटक केल्याने नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी मुदखेड नगर परिषदेतील विविध विकास कामे केली आहे. केलेल्या कामांची ३४ लाख ८४ हजार ५२६ रुपयांची रक्कम देण्यासाठी नगराध्यक्ष अन्सारी याने १७ प्रमाणे ५ लाख ९२ हजार ३९६ रुपये होत असून राऊंड फिगर ५ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी १ ऑगस्ट रोजी याची तक्रार नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ७) पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणी दरम्यान अन्सारी याने ३ लाख १२ हजार रुपयांची मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मुदखेड नगर परिषदेमध्ये सापळा लावला. दरम्यान, अन्सारी याने लाचेची रक्कम खासगी इसम एजाझ याच्याकडे देण्यास सांगितले. खासगी इसमाला लाचेची रक्कम स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. तर नगराध्यक्ष अन्सारी याला लाच मागितल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. रंगेहाथ पकडण्यात आलेल्या नगराध्यक्ष आणि खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाईपोलीस अधीक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधीक्षक अर्जना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कपील शेळके, पोलीस नाईक बालाजी तेलंगे, गणेश तालकोकुलवार, जगन्नाथ अनंतवार, सुरेश पांचाळ, नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like