Kolhapur News : जिल्हा प्रशासन ‘थुंकीमुक्त’ कोल्हापूर चळवळीच्या भक्कमपणे पाठीशी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या वाईट सवयी च्या विरोधात जनजागृती करण्यासाठी शहरात ‘अँटी स्पीट मूव्हमेंट’ हि चळवळ उभी राहिली आहे. ‘अँटी स्पीट मूव्हमेंट या चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देत मागील महिन्यात राबवलेल्या जनजागृती मोहीम याची सविस्तर माहिती देण्यातआली.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, देशात प्रथमच कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी अशी लोकचळवळ उभी राहिली आहे. या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रश्न हाताळला जातो आहे. हे विशेष आहे. तसेच यावेळी जनजागृती बरोबरच शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये सार्वजनिक ठिकाणी थुंकीमुक्त क्षेत्र करण्याबाबत तसेच थुंकणा-या विरोधात कडक कारवाई करण्याबाबत सकारात्मक विचार झाला.

जिल्हा प्रशासन या चळवळीच्या पाठीशी असेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली. तसेच शालेय स्तरावर मुलांच्यात हा विषय आधीपासूनच रुजवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण विभागाला याबाबत सूचित केली जाईल असे ते म्हणाले, यावेळी सर्व अधिकारी आणि चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.