विद्रोही साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून ग्रेटा थनबर्गला बोलावण्याचा विचार, 14 फेब्रुवारीला होणार अंतिम निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी आणि भावना भडकावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेली स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला नाशिक येथे होणा-या 16 व्या विद्रोही साहित्य संमेलनाची उद्घाटक म्हणून बोलावण्याची सूचना काही कार्यकर्त्यांनी मांडली आहे. ग्रेटाला बोलावण्याबाबतचा अंतिम निर्णय येत्या 14 तारखेला होणाऱ्या आयोजकांच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी हुतात्मा स्मारक येथे रविवारी (दि. 7) बैठक पार पडली. या बैठकीत संमेलनासाठी कशा प्रकारच्या समित्या स्थापन करायच्या याची चर्चा झाली. विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन ग्रेटा थनबर्ग हिच्या हस्ते करण्याची सूचना या बैठकीतील सर्वात वेगळी आणि लक्षवेधी ठरली आहे. बैठकीत विविध ठरावांवर देखील चर्चा झाली. तसेच एक मूठ धान्य, एक रुपया या संकल्पनेवर आधारित निधी उभारण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. दरम्यान दिनांक 20 ते 25 मार्च या कालावधीत थोर साहित्यिक बाबुराव बागूल यांच्या स्मृतिदिनानिमित्त सप्ताह आणि त्यांचे जन्मस्थळ असलेल्या विहित या गावात असलेल्या घरापासून मशालज्योत काढण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलनात दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे.