Coronavirus : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शासनाने यासाठी एक कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार अशा व्यक्तींना सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही घरपोच सेवा मिळणार आहे.

वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तींनी हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ही सेवा त्यांना उपलब्ध होऊ शकेल. यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत.

पोलीस यंत्रणेच्यावतीने यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था, सेवा पुरवठादार, औषध विक्रते, घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती यांना पोलीस यंत्रणेच्यावतीने प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत. स्वयंसेवी संस्था हेल्पलाईनवर प्राप्त झाल्याप्रमाणे वयोवृद्ध, अपंग व्यक्तींना आवश्यक ते सहाय करतील. मुंबई महानगर पालिका क्षेत्रासाठी 1800221392 या क्रमांकावर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सपर्क साधता येईल.