Coca Cola पुढील 30 दिवस सोशल मीडियावर देणार नाही जाहिरात, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जाहिरात देणारी कंपनी कोका-कोलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किमान ३० दिवस जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोका कोलाचे अध्यक्ष आणि सीईओ जेम्स क्विन्सी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जगात वर्णभेदाचे कोणतेही स्थान नाही आणि सोशल मीडियावरही वर्णभेदाला कोणते स्थान नाही.” ते म्हणाले की, सोशल मीडियाला अधिक जबाबदार व पारदर्शक बनवणे आवश्यक आहे. अनेक मोठ्या ब्रँड्सने द्वेषयुक्त सामग्रीस सामोरे जाण्यासाठी पावले उचलण्याबाबत दबाव आणण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बहिष्कार टाकला आहे.

क्विन्सी म्हणाले की, ‘या ३० दिवसांत कोका-कोला आपल्या जाहिरात धोरणाचे नव्याने मूल्यांकन करेल. तसेच बदल आवश्यक आहे की नाही हेदेखील ते निर्धारित करतील.’

सॉफ्ट ड्रिंक कंपनीने सांगितले आहे की, जाहिरातीबाबत घेतलेल्या या सध्याच्या ब्रेकचा अर्थ असा नाही की, कंपनी गेल्या आठवड्यात आफ्रिकन अमेरिकन आणि सोशल सोसायटीच्या गटांनी सुरू केलेल्या मोहिमेमध्ये सामील होत आहे.

हे गट कंपन्यांना फेसबुकवर जाहिरात थांबवण्यास सांगत आहेत. या गटात नॅशनल असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल (एनएएसीपी) सारख्या संघटनांचा समावेश आहे. हे गट #StopHateForProfit सह मोहीम चालवत आहेत.

या मोहिमेचे उद्दीष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेष, वर्णभेद किंवा हिंसा पसरवणाऱ्या गटांशी काटेकोरपणे सामोरे जाण्यासाठी यंत्रणा विकसित करणे आहे.

लिप्टन टी आणि बेन अँड जेरी आईस्क्रीम सारखे पदार्थ बनवणाऱ्या युनिलिव्हरने म्हटले आहे की, निवडणुकीच्या ध्रुवीकरण कालावधीमुळे २०२० च्या अखेरपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी फेसबुकने म्हटले की, ते जाहिरातींमध्ये द्वेष पसरवणाऱ्या सामग्रीला प्रतिबंधित करतील. संकटाचा सामना करत असलेल्या सोशल मीडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात निषेधाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली आहे.