नगरसेवकाच्या बेकायदा फलक प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – भाईंदर येथील एका बेकायदा जाहिरात फलक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश देऊनही भाईंदर पोलिसांकडून उल्लंघन केले जात आहे. एका नगरसेवकाशी संबंधित फलक असल्याने पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केला आहे .

याबाबतची माहिती अशी की, भाईंदर पश्चिम येथील महापालिका शाळेच्या सीमाभिंत व सार्वजनिक वीजखांबावर बेकायदेशीर जाहिरात फलक लावला होता. सदरचा फलक हा शाळेजवळ राहणारे नगरसेवक जयेश भोईर यांच्या कुटुंबीयांचा होता. या प्रकरणी 29 जानेवारी रोजी माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी भांडार पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याकडे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. दुस-या दिवशी सुवर्णा हे गुन्हा दाखल झाला का याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यावेळी सुवर्णा यांनी निरीक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवून पोलिसांची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यानंतर वसई येथे जाऊन पोलीस उपायुक्त संजय पाटील यांना भाईंदर पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार दिल्याचे सुवर्णा यांनी सांगितले.