‘फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्तीकडे लक्ष दिल असतं तर बर झाल असतं’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या लसीकरणाचे उद्धाटन करताना फोटो काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती. राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वत:चे फोटो काढून घेतले. त्यामुळे फोटोशूट करण्यापेक्षा लसीकरणाची प्रोसेस आणि झालेली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिल असतं तर बरे झाले असते. दोन दिवसांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम थांबला नसता, असा खोचक टोला कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

कोविन ॲपमध्ये शनिवारी संध्याकाळी उशिरा तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेला लसीकरण मोहीम अर्ध्यावरच थांबवावे लागले आहे. त्यामुळे आज आणि उद्या (दि. 17 व 18 जानेवारी) असे दोन दिवस लसीकरण स्थगित केल्याचे पालिका प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केले. लसीकरण स्थगित झाल्यानंतर निरुपम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. लसीकरण करताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीची आहे. पण शनिवारी तांत्रिक अडचण आल्याने ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मुंबईत दोन दिवस लसीकरण स्थगित ठेवले असून कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

राज्यात 18 हजार 368 पेक्षा अधिक आरोग्य कर्मचा-यांना लस
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी लसीकरण मोहिमेचा आरंभ करण्यात आला. दिवसभरात लसीकरणाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. राज्यात कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यातील 285 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यातील सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर अन्य केंद्रांवर सिरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली. राज्यात पहिल्याच दिवशी सुमारे 18 हजार 368 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.