काँग्रेस नेते मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना भेटले, म्हणाले – ‘महाविकासच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   “लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही,” असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. जनतेला त्यांनी संबोधित केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती, प्रस्तावित लॉकडाऊन यांसारख्या विषयांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजनांच्या संदर्भात चर्चा केली. याबरोबरच राज्यातील सद्याची राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भातही सविस्तर चर्चा झाली.

तसेच संजय राऊत यांनी युपीएसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाली होती त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असेही पाटील म्हणाले.