काँग्रेसकडून उमेदवारी करणार : डॉ. सुजय विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्‍या माध्‍यमातूनच उमेदवारी करण्‍याचा माझा निर्णय आहे. पण जागा वाटपात काँग्रेसला ही जागा मिळाली नाही तर, वेगळा राजकीय निर्णय करण्‍याचे सुतोवाच करताना, मी अन्‍य पक्षात जाण्‍याबाबत आणि कॉंग्रेस पक्ष सोडण्‍याबाबत कोणतेही भाष्‍य केलेले नाही. माझ्या वक्‍तव्‍याचा केवळ सोईने अर्थ काढला गेला असल्‍याचा खुलासा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शिबलापूर येथे निळवंडे कालव्‍यांच्‍या मागणीसाठी शेतकर्‍यांच्‍या आंदोलनानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले की, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्‍याचा माझा निर्धार कायम आहे. काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. पक्षाकडून मला उमेदवारी मिळेल असा माझा विश्‍वास आहे. पण जागा वाटपात काही वेगळा निर्णय झाल्‍यास आणि काँग्रेस पक्षाच्‍या वाट्याला हा मतदार संघ न आल्‍यास मी काही वेगळा राजकीय निर्णय घेतल्‍यास तो माझा वैयक्तिक निर्णय असेल असे मी बोललो. याचा अर्थ मी काँग्रेस पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जाणार असा होत नाही. याकडे लक्ष वेधून सुजय म्‍हणाले की, माझ्या वक्‍तव्‍याचा पत्रकारांनी वेगवेगळ्या अर्थाने अंदाज लावला हे अतिशय चुकीचे आहे.

यापुर्वी या जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषद, नगरपालिकेच्‍या झालेल्‍या निवडणुका या काँग्रेस पक्षाच्‍या माध्‍यमातुनच लढविल्‍या आहेत. विरोधी पक्षनेते ना. राधा‍कृष्‍ण विखे-पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍ह्यामध्‍ये पक्षाचेच काम एक कार्यकर्ता या नात्‍याने पुढे घेवून मी जात आहे. सरकारच्‍या धोरणांविरोधात विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी मागील साडेचार वर्षात घेतलेली आक्रमक भुमिका, शेतकर्‍यांचे आणि सामान्‍य माणसांचे मांडलेले प्रश्‍न पाहाता माझ्या वक्‍तव्‍यामुळे त्‍यांच्‍या राजकीय कारकीर्दीला गालबोट लागू नये एवढी काळजी माध्‍यमांनी घ्‍यावी, अशी इच्‍छा डॉ. विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.