वॉलमार्टकडून फ्लिपकार्ट विकत घेण्यास ग्राहक पंचायतीचा विरोध

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

अमेरिकन कंपनी वॉलमार्टकडून इंडियन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट विकत घेण्यात येणार आहे. यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांच्या विक्री आणि व्यवसायावर परिणाम होणार आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने संपूर्ण भारतभर या गोष्टीला विरोध केला जात आहे. देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले जात आहे. त्यामुळे पुण्यात देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सूर्यकांत पाठक, शैलेश राणीम, उदय जोशी, तुषार गायकवाड, किरण गुंजाळ, थकसेन पोरे आदी उपस्थित होते.
सूर्यकांत पाठक म्हणाले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्यावतीने संपूर्ण भारतात अमेरिकन कंपनी वॉलमार्टकडून इंडियन ई – कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट विकत घेण्याला विरोध केला जात आहे. वॉलमार्ट ही चिनी वस्तूंची अमेरिकन विक्रेता कंपनी आहे. या कंपनीमधून मिळणारा नफा अमेरिकेत जाणार आणि चिनी लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या स्वप्नाला बाधा पोहोचणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत संपूर्ण भारतात पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिका-यांना निवेदने देत असून अशाप्रकारच्या बेकायदा खरेदीला त्वरित थांबवावे, अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

या व्यवहारामुळे देशातील लोकांचा रोजगार हिरावले जातील. स्वस्त दरात माल खरेदी केल्याने शेतक-यांचे देखील नुकसान होणार असून महाग दरात माल विकल्यावर ग्राहकाचे नुकसान होईल. तसेच देशातील लघु उद्योग करणा-या व्यावसायिकांना व्यवसाय बंद पडेल. त्यामुळे याला आमचा विरोध आहे.