कोरोना रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदारपुत्राकडून मारहाण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन –  गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम याने आरमोरी येथील शासकीय कोविड रुग्णालयातील डॉ. अभिजित मारबते यांना मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉरेन्स गेडाम याला ताब्यात घेतले आहे.

ही घटना बर्डी भागातील कोविड केअर सेंटरवर बुधवारी सायंकाळी सात वाजता घडली. या कोविड सेंटरवर सायंकाळी लॉरेन्स गेडाम हे आपल्या गृहविलगीकरणात असलेल्या नातेवाईकाच्या गोळ्या घेण्यासाठी गेले होते. तेथील वैद्यकीय कर्मचार्‍यांनी गोळ्या दिल्या. पण लॉरेन्स याला नेहमीपेक्षा अधिक अतिरिक्त गोळ्या हव्या होत्या. अतिरिक्त गोळ्या देण्यावरुन तो कर्मचार्‍याशी वाद घालू लागला. तेव्हा नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांनी हस्तक्षेप करुन पेशंटला गरज आहे इतक्याच गोळ्या मिळतील, असे सांगितले. त्यावर लॉरेन्स ने शिवीगाळ करीत डॉ. मारबते यांना मारहाण केली.

या घटनेनंतर डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. लॉरेन्स गेडाम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. दरम्यान, लॉरेन्स गेडाम याच्याविरुद्ध वैद्यकीय संरक्षण कायदा व सरकारी कर्मचाºयाच्या कामात अडथळा आणल्याबद्दल ३५३ कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.