13 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल, पण मोजावे लागणार साडेचार हजार रुपये

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने परदेशातून येणार्‍या सर्वाना कोरोनाचा चाचणी अत्यावश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यास खुप वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर आता १३ मिनिटात कोरोना चाचणी अहवाल मिळणार आहे. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी तब्बल साडेचार हजार रुपये मोजावे लागणार आहे.

विमानाने प्रवास करणारे हे गर्भ श्रीमंत असतात, असा भारतात अजूनही सर्वत्र समज आहे. त्यामुळे विमानतळावर अगदी साध्या पाण्याच्या बाटलीपासून जवळपास सर्वच वस्तू दामदुप्पट किंमतीने विकल्या जातात. त्यात आता कोरोना चाचणीचा समावेश झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी राज्य शासनाने ७०० रुपये हा दर निश्चित केला आहे. परदेशातून येणार्‍या प्रवाशांना विमानतळावर जास्त वेळ थांबावे लागू नये, म्हणून ही सुविधा देण्याच्या नावाखाली त्यांना तब्बल ६ पट अधिक शुल्क मोजावे लागणार आहे.