Corona Vaccination : पहिल्या डोसनंतर ‘कोरोना’ झाला?, मग आता कधी घ्याल दुसरा डोस? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकर माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोरोना लसीकरण वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकजण कोरोना लसीकरण करु शकणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये लस घेतल्यानंतर देखील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घेयचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर देशभरातील 25 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 हजार 208, तर दुसरा डोस घेतल्यानंतर 695 लोकांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. कोविशील्ड लस देशातील सुमारे 11 कोटी लोकांना मिळाली आहे. यापैकी पहिला डोस घेतल्यानंतर 17 हजार 145 आणि दुसऱ्या डोसनंतर 5 हजार 014 लोकांना कोरोना झाला.

लसीचा डोस घेतल्यानंतर देखील कोरोना होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर त्या व्यक्तीने कोरोनाचा दुसरा डोस कधी घेयचा असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नाला तज्ज्ञांनी उत्तर दिले आहे.

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह झाला तर दुसरा डोस आठ आठवड्यांनी म्हणजे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर घेतला पाहिजे. पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांनी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. पण कोरोना झाला असेल तर लसीचा दुसरा डोस पहिल्या लसीनंतर आठ आठवड्यांनी घेणे चांगले आहे.