Vaccination in Maharashtra : लसीकरणात महाराष्ट्र TOP ला ! एकाच दिवशी 5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना देण्यात आली लस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानुसार, राज्यभरात लसीकरण मोहीमेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून, पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. ही आकडेवारी आज सायंकाळी सहापर्यंतची असल्याने अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते.

राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु असताना आता लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे. महाराष्ट्र राज्य लसीकरणात देशात सातत्याने अव्वल स्थानावर आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजी 4,62,735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. त्यानंतर आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. आतापर्यंत 1,43,42,716 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये आजची संख्या मिळवली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या जाईल. त्यामुळे उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल

राजस्थान, उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांतही लसीकरण सुरु आहे. मात्र, या राज्यांत सुरु असलेल्या लसीकरणाच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. आज (ता.26) राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6,155 लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 800 खासगी केंद्रांचा समावेश आहे.